कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवाय येणारी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर येथे बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
स्वतःला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे मागणीसुद्धा केली होती. काँग्रेसमधूनच निवडणूक लढवायचे असे ठाम मत होते. मात्र, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमधून निवडणूक न लढविण्याचा जोरदार आग्रह होता. शिवाय कलम 370 आणि कलम 35 अ रद्द करण्याचा धाडसी निर्णय भाजपने घेतला. जे गेल्या अनेक वर्षांपूर्वी काँग्रेसने करायला पाहिजे होते. ते शक्य झाले नव्हते तो निर्णय भाजपने घेतला. मी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. या विषयावरची मतमतांतरे वाढायला लागली. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे, असे विषय पक्षात राहून वेगवेगळ्या विचाराने काम करणे खूप अवघड असल्याची जाणीव झाली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मला माझी मतं स्पष्टपणे मांडता आली पाहिजे हा माझा स्वभाव आहे. मात्र, त्यामध्ये पक्षीय बंधने आड येत आहेत. त्यामुळे त्यामधून मुक्त होण्याचा निर्यण घेतला असल्याचे आवाडे म्हणाले.
कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेबाबत नाराजी - आवाडे
काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षापासून आवाडे गटाला दुजाभाव दिला आहे. काँग्रेस पक्षावर सध्या देशामध्ये नाराजी आहे. तसेच इचलकरंजी शहरातील सर्वच कार्यकर्ते काँग्रेच्या विचारसरणीवर नाराज आहेत. कार्यकर्त्यांचा इचलकरंजीमध्ये मेळावा घेण्यात आला. यावेळी खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. सर्वच कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून लढवण्याचा सूर लावला होता. माझ्याकडे आणि माझे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडे सुद्धा कार्यकर्त्यांनी अशी मागणी करून विनंती केली होती. त्यांनी सुद्धा सगळ्यांचा आग्रह मान्य केला. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना शंभर टक्के यश मिळाले पाहिजे. तसेच इचलकरंजीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कार्यकर्त्यांचे जे मत असेल त्यासाठी मी सुद्धा सहमत असेल, अशी स्पष्ट भूमिका मी आणि माझे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी व्यक्त केली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काँग्रेस पक्षातून निवडणूक न लढवता अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका जाहीर केली, असल्याचे प्रकाश आवाडे म्हणाले. यावेळी त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे सुद्धा उपस्थित होते.