कोल्हापूर - कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून पन्हाळगड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद होता. आजपासून पन्हाळा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. स्थानिक व्यावसायिकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी व व्यावसायिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्वच नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी केले आहे.
मार्च महिन्यापासून 30 सप्टेंबरपर्यंत पन्हाळगड पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद होता. याचा येथील व्यावसायिकांना मोठा फटका बसला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. पन्हाळगडाच्या पर्यटनावर अर्ध्यापेक्षा जास्त स्थानिक लोक अवलंबून आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी पन्हाळगड पर्यटकांसाठी खुला करावा, अशी वारंवार मागणी केली होती. त्यानुसार आजपासून पन्हाळगड पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष रूपाली धडेल व मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांनी सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासनाने परवानगी दिल्याने पर्यटकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक पन्हाळगड आणि निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेता येणार आहे.