कोल्हापूर Oppose To Bawankule Visit: दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्हा भाजपाची संघटनात्मक पुनर्रचना झाली. जिल्ह्याच्या नव्या कार्यकारणीत निष्ठावंतांना डावलण्यात आलं, असा आरोप करत या नियुक्त्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याआधी या नियुक्त्या रद्द कराव्यात अन्यथा बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येऊ नये अशी भूमिका भाजपात गेली 50 हून अधिक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मांडली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याला अंतर्गत वादाचे ग्रहण लागले आहे.
निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप: भाजपा सत्तेत नसतानाही गेली 50 हून अधिक वर्ष ज्या पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून आम्ही काम केले अशा पदाधिकाऱ्यांनाच आता डावललं जात आहे. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून सत्ताकाळात आमचा समावेश नाही. आमचं कोणतं वैयक्तिक नुकसान झालं आहे म्हणून आमची खदखद नाही. तर जो पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रक्त आटवलं त्या पक्षाचे सदस्यही नसलेले लोक आज पदाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्त्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने झाले असून त्यांनीही नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केला आहे. नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देऊन पक्ष विस्तार करणे ही भूमिका पटते; मात्र जो कार्यकर्ता सत्ता नसतानाही पक्षासोबत राहिला त्यालाच बाजूला करण्याची ही नवी यंत्रणा पक्षासाठी घातक असल्याच्या भावना ज्येष्ठ पदाधिकारी बाबा देसाई यांनी मांडली.
नियुक्त्या मागे घ्या अन्यथा दौऱ्यावर येऊ नका: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने निष्ठावंतांना डावलून पक्षाचे सभासदही नसलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या नियुक्त्या मागे घ्याव्यात, अशी मागणी करत माजी संघटन मंत्री शिवाजी बुवा, माजी जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी जाधव, जिल्हा सचिव अनिल देसाई, अजितसिंह चव्हाण, एकनाथ पाटील, नाथाजी कुरणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. यामुळे भाजपामधील अंतर्गत धुसपुस समोर आली आहे.
हेही वाचा:
- Rohit Pawar on Nanded Case : केवळ डीनला बळीचा बकरा करु नका, मंत्रीही तितकेच जबाबदार...; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
- NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 'या' तारखेला होणार सुनावणी
- Chandrashekhar Bawankule On Congress : 'काॅंग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण', चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका