कोल्हापूर- केंद्राने केलेल्या मोटार वाहन कायद्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, असे मत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले आहे. आजच केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहन कायद्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत वाहन चालकांना दंड व्हावा, हा हेतू नाही तर, लोकांनी कायदा पाळावा हा हेतू असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही केंद्राने केलेल्या कायद्यामध्ये काही बदल करावयाचे असतील तर राज्याला काय अधिकार आहेत याबाबत आम्ही राज्याच्या विधी खात्याकडून अभिप्राय मागविला असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील 25 गडकोटांवर हॉटेल आणि विवाह समारंभ करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत विचारले असता याबाबत पर्यटन मंत्र्यांना विचारा, असे सांगत या प्रकरणावर रावते यांनी मौन बाळगले. कोल्हापुरात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आज छत्रपती शाहू महाराज, परिवहन मंत्री रावते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरातील शिवाजी चौकात केलेल्या सुशोभीकरणाचे उद्घाटन झाले. तसेच पुरग्रस्तांना रोख मदतीसह जनावरांचे वाटपही करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण व मदतनिधी वाटपाचा कार्यक्रम झाला.