कोल्हापूर - जिल्ह्यातील मुस्लीम बांधव नेहमीच सामाजिक कार्यात आजपर्यंत सेवा देत आले आहेत. कोरोनाच्या या संकटकाळातही याची प्रचिती आली आहे. 'रमजान ईद' हा मुस्लीम बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. मात्र, यंदा संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे त्यांना अतिशय साध्या पद्धतीने सण साजरा करत ६० लाख रुपयांचा निधी गोळा केला. त्यामधून इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी १० खाटांचे सुसज्ज अतिदक्षता विभाग उभारण्यात आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी शासनांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनानुसार इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील मुस्लीम बांधवांनी ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रक्कम कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी देण्याचे ठरवले. त्यानंतर सर्वांनीच याला प्रतिसाद दिला. बघता बघता कोल्हापुरात जवळपास 30 लाख आणि इचलकरंजी येथील मुस्लीम बांधवांनी सुद्धा 36 लाख रुपये गोळा केले. जमा झालेल्या रक्कमेतून इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात 10 खाटा, तर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात 10 खाटांचे सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले.
कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडून यापूर्वीही अनेक असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी महापुराच्यावेळीही यांच्याकडून पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला होता. यावर्षी आपला सण साध्या पद्धतीने साजरा केला. वाचलेल्या खर्चातून आयजीएम आणि सीपीआर रुग्णालयाला मदत करून जे योगदान दिले आहे ते नेहमीच कोल्हापूरसह संपूर्ण देशासाठी आदर्श असणार आहे. 'रामजान ईद'चे औचित्य साधत या दोन्ही रुग्णालयातील अतिदक्षता विभागांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इचलकरंजी येथील, तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील अतिदक्षता विभागाचे लोकार्पण करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सर्व मुस्लीम बांधवांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कौतुक केले. तसेच संपूर्ण देशाने याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. संकट काळात आपला सण कसा साजरा करायचा? याचे हे कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांनी सर्वांना दाखवून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.