कोल्हापूर Kolhapur Airport Name : कोल्हापुरात बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज (तृतीय) यांचं नाव द्यावं, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे अनेक वेळा दुर्लक्ष करण्यात आलं. आता या मागणीनं पुन्हा एकदा जोर पकडला आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यापूर्वी कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्यावं, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली.
राजाराम महाराजांनी विमानतळाची बांधणी केली : शहराच्या विकासाच्या दृष्टीनं राजाराम महाराजांनी कोल्हापुरात सर्वप्रथम विमानतळाची बांधणी केली होती. हे विमानतळ ५ जानेवारी १९३९ रोजी वापरासाठी खुलं करण्यात आलं होतं. मात्र, नियमित विमानसेवा सुरू होण्यास तब्बल ८० वर्ष लागली. सध्या या विमानतळवरून देशांतर्गत अनेक शहरांना सेवा पुरवली जाते. आता येथे अत्याधुनिक विस्तारित टर्मिनल उभारण्यात आलं आहे. याचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यापूर्वी कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्यावं, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभेत ठराव : खासदार महाडिक राज्यसभेत बोलताना ही मागणी केली आहे. "छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर संस्थानात विमानसेवा सुरू केली होती. त्यामुळे येथील विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं. याबाबतचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत करण्यात आला होता. आता कोल्हापुरच्या नव्या विस्तारीत टर्मिनल बिल्डिंगचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापूर्वी याचं नामकरण करण्यात यावं", असं महाडिक राज्यसभेत म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरीची प्रतीक्षा : केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जून महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी या मागणीचा पाठपुरावा केला होता. "कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजचं नाव देण्यात यावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून माझ्याकडे प्रस्ताव आला आहे. आमच्या कार्यालयाकडून तो मंजूर करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. तेथे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया राबवण्यात येईल", असं सिंधिया म्हणाले होते. मात्र अद्याप देखील हा प्रश्न प्रलंबित असल्यानं केंद्र सरकारकडून या नामकरणाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :