कोल्हापूर - कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू, सुनेचा ओढ्यामध्ये पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी या गावामध्ये ही घटना घडली. मीना विष्णू येडेकर (वय 55) आणि अनुराधा महेश येडेकर (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावरच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीना येडेकर आणि अनुराधा येडेकर या सासू-सुना आज सकाळी गावाजवळ असलेल्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तिथे पोहोचताच ओढ्यामध्ये विद्युत खांबावरील तार पडली. या तारेचा शॉक लागून दोघींचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले.
महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या विद्युत खांबावर असलेली तार खाली पडण्याच्या स्थितीमध्ये होती. या बाबत वारंवार महावितरणला कळविण्यात आले होते. मात्र कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोघींचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच महावितरणविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'आप'चा कोल्हापूर महानगरपालिकेवर 'पंचनामा मोर्चा'
हेही वाचा - थकीत वेतनासाठी कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन