कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू होती. मात्र पवार साहेबांनी त्याचे खंडन केले आहे. हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. केंद्रात आघाडी झाली तर शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न राहील, असेही मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.
'धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतील'
पदवीधर व शिक्षक निवडणुकीत भाजपाला पराभवाचा फटका बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा आणि चंद्रकांत पाटील करतील, असा टोला त्यांनी लगावला. आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र पक्षश्रेष्ठींची समजूत घालून ही निवडणूक स्वतंत्रपणे कशी लढता येईल, याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी आम्हाला स्वतंत्रच लढावे लागेल, ही बाब आम्ही पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असेदेखील मुश्रीफ म्हणाले.
'आणखी सेवेची संधी मिळावी'
राजकारणात आणि समाजकारणात अनेक विक्रम शरद पवार यांनी केले आहेत. त्यांना आणखी देशाची सेवा करण्याची संधी मिळावी. त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दात मुश्रीफ यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.