कोल्हापूर : पुणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमधील ३०३ कोटींच्या कामांच्या मंजुरीसंदर्भात झालेल्या बैठकीत सर्वांना समान निधीचे वाटप करण्यात आले असून कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Higher and Technical Education Minister Chandrakant Patil ) यांनी दिली आहे. तसेच विकासकामांमध्ये मी कधीही राजकारण करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
303 कोटींच्या कामांना मंजुरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकारच्या स्थापनेनंतर जिल्हा नियोजनमधील आधीच्या कामांना स्थगिती दिली होती. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर ही स्थगिती उठवताना, प्रत्येक काम तपासून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन सचिवांकडून सर्व कामांचा आढावा घेऊन ३०३ कोटीच्या कामांना मंजुरी दिली. यात विरोधी आमदारांच्या एकही रुपयांच्या कामांना कात्री न लावता सर्वांना समान वाटप होईल, अशा पद्धतीने कामे मंजुर केली असल्याचे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी असमान निधी वाटप केला - अजित पवार पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनमधून आमदारांना निधीचे असमान वाटप झाले होते. अजितदादांनी स्वत: साठी ८० कोटी रुपये घेतले होते. तर दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रयमामा भरणे यांना ४० कोटी रुपये दिले होते. यापैकी निम्मा निधी कमी करुन, तुर्तास सर्वांना समान वाटप केले आहे. तसेच जी निम्मी कामे राखून ठेवली आहेत. त्यांचे वर्षा अखेरिस पुनर्विलोकन करुन ती कामे केली जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा आमदारांना शून्य निधी मिळत होता. तेव्हा आम्ही कुठेही काहीही केलेले नाही. विकासामध्ये आम्ही कधीही राजकारण करत नाही. त्यामुळे सर्व आमदारांना समान न्याय देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३०३ कोटीच्या कामांना निधी मंजूर केला आहे असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे.