कोल्हापूर- मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा आरक्षणाची मागणी करत पुणे- बंगळुरू महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने प्रयत्न करावेत, अन्यथा पुढील काळात मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
विद्यमान राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाली, असा आरोप कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली.
हेही वाचा-'मराठा क्रांती'ची ठिणगी पडली..! सोलापुरात सरकार विरोधात तिरडी आंदोलन
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय असतानासुद्धा कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते महामार्गावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी त्यांना बाजूला घेत ताब्यात घेतले.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे सचिन तोडकर, दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे, राजेंद्र चव्हाण, सुनील चव्हाण , रवींद्र मुदगी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.