कोल्हापूर - वेळ आली होती पण काळ आला नव्हता, अशी आपल्याकडे म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातील ऐतवडे येथे राहणाऱ्या राहुल पाटील यांना आला आहे. त्यांनी एका नागासोबत तब्बल चाळीस किलोमीटरचा प्रवास केला. पण, अचानक नाग गाडीतून बाहेर आल्यानंतर राहुलची भंबेरी उडाली अन् त्यांनी चालत्या गाडीवरुन उडी मारत जीव वाचवला.
याबाबत अधिक माहिती अशी, ऐतवडे खुर्द येथील राहुल पाटील हे कोल्हापुरात नोकरी करतात. रोज त्यांच्या चाळीस किलोमीटरचा प्रवास होतो. बुधवारी (दि. 24 जून) नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून कोल्हापूरकडे यायला निघाले. कोल्हापुरात महावीर कॉलेज परिसरात आले असता त्यांना, गाडीच्या पुढील भागात काहीतरी असल्याचे दिसून आले. दुचाकीच्या मडगार्डमध्ये नाग असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी गाडीचा वेग हळू केला. त्याच क्षणी नागाने पाटील यांचा दंश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत पाटील यांनी चालत्या दुचाकीवरून उडी मारली.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे आजूबाजूच्या लोकांनी पाटील यांच्याकडे धाव घेतली. काहींनी पाटील यांना सावरले तर काहींनी रस्त्याकडेला पडलेली गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाटील यांनी दुचाकीत साप असल्याचे सांगितले. नागरिकांनी दुचाकीतील साप बाहेर काढला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
हेही वाचा - वाढीव लाईट बिलाच्या निषेधार्त कोल्हापुरात शिवसेनेचे आंदोलन; बिलांची केली होळी