कोल्हापूर : कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने मतदार संघाचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे. नाराज झालेले भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढत नाराजी दूर केली आहे. तुम्ही तुमचे विधानसभेच्या अनुषंगाने काम सुरू ठेवा, कोणी आडवे आले तर आपण परतवून लावू असे देवेंद्र फडणवीस म्हंटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे नाराज असलेले समरजीत घाटगे हे आज कोल्हापुरात आले असून, उद्या कागल येथे सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट : गेली कित्येक वर्ष विरोधात असलेले माणसे सोबत आल्याने, अनेक जणांची गळचेपी झाल्याचे दिसून येत आहे. तर अनेक जण नाराज देखील झाले आहेत. कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने मतदार संघाचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने याचा थेट परिणाम भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यावर झाला आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आणि नाराज असलेले समरजित घाटगे यांनी मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तुम्ही तुमची लोकसभेची तयारी सुरू ठेवा. तुमच्या आडवे कोण आहे त्यांना रोखण्याची ताकद आहे. यामुळे तुम्ही नाराज होऊ नका असे स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधणार : यामुळे गेल्या तीन दिवस मुंबईत असलेले समरजीत घाटगे हे आज कोल्हापुरात येत असून आपल्या कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. यानंतर ते आपली पुढची भूमिका उद्या सकाळी 10 वाजता कागल येथे जाहीर करणार आहेत. यामुळे समरजीत घाटगे हे भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशा सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या पाऊण तासाच्या चर्चेत त्यांच्यासोबत शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष बाळ घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, शाहूचे संचालक युवराज पाटील, भाजप तालुका अध्यक्ष संजय पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
अशी आहे कागल मधील राजकीय परिस्थिती : कागलच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात २०१९ ला मोदी लाट असताना विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला. तर याच पराभवाचा वचपा २०२४ ला काढण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माझाच विजय असणार असे जाहिर करत मतदार संघातील एकाही सभा, मेळाव्यातून मुश्रीफांवर बोलण्याची संधी सोडली नाही. तर अलिकडच्या काळात मुश्रीफ - घाटगे वाद इतका विकोपाला गेला की अगदी वैयक्तिक पातळीवर टीका होऊ लागल्या आहेत. एकमेकांविरोधात कागलमध्ये मोर्चे निघू लागले.
मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड : दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि यानंतर हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली. तर किरीट सोमय्या यांना कागलमधून कागदपत्र पुरवण्यात आली असे म्हणत ईडी आणि धाडी यांच्यामागे घाटगे आहे, असा आरोप करण्यात आला. मात्र राजकीय भूकंपात भाजप-शिंदे शिवसेनेच्या गोटात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर आमदार हसन मुश्रीफ यांनी समर्थन देत, कॅबिनेट मंत्रीपद ही मिळविले. यामुळे मुश्रीफ समर्थकांत उत्साह पसरला. मात्र, मुश्रीफच भाजप सोबत आल्याने समरजीत घाटगे यांना जोरदार झटका बसला असून, यानंतर त्यांनी आपला फोन देखील बंद ठेवला होता.
हेही वाचा -
- Political Crisis विकासकामांसाठी मंत्री मुश्रीफ भाजपसोबत कागल मतदार संघातील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
- Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या सविस्तर
- Mumbai HC On Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा