कोल्हापूर - 2019प्रमाणेच यंदाही कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये, यासाठी प्रशासन संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, पंचगंगा आणि कृष्णेचे पाणी पुढे जाऊन ज्या धरणामध्ये मिळते त्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावरच महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठीच आज (शनिवारी) महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा भेट घेऊन पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक घेणार आहेत. कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराची नेमकी काय कारणं आहेत? सद्या प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे? यावर्षी कशा पद्धतीने पाऊस सुरू आहे? याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष आढावा...
अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक -
संभाव्य महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने वडनेरे समिती आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालातून सुचविलेल्या उपायोजनांकडे सरकारने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मात्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सर्वाधिक महापुराचा फटका बसण्यामागे एक महत्त्वाचे कारण असलेल्या अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत दोन्ही राज्यात समन्वय असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये दोन्ही राज्यांनी पूरनियंत्रणाचे काम समन्वयाने करून दोन्ही राज्यातील होणाऱ्या नुकसानीला कशा पद्धतीने रोखता येईल? याबाबत चर्चा होणार आहे.
2019मध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक गावांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण अशीच आहे. अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे प्रामुख्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. त्यामुळे यंदाही कोल्हापूर, सांगलीसह, सातारा, बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील जवळपास 500 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 120 गावे तर कोल्हापूर जिल्ह्यातील 130 गावांचा समावेश आहे.
गेल्या 3 दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात मुसळधार -
गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी आणि सांगलीतील कृष्णा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. सद्या कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.08 फुटांवर आहे तर सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी सुद्धा 24 फुटांवर पोहोचली आहे. अवघ्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत असल्याने यावर्षीही दोन्ही जिल्ह्यांना संभाव्य महापुराचा धोका आहे. शिवाय राधानगरी, चांदोली, कोयना धरणातूनसुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासन सज्ज -
संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीमध्ये 50 रबर बोट, टॉर्च सर्चलाईट 40, लाईफ बाईज 30, सेफ्टी हेल्मेट 50, मेगा फोन 21, फ्लोटिंग पंप 7, स्कुबा डायव्हिंग सेट 2, लाईफ जॅकेट 200, लाईफ बॉय रिंग 306, फ्लोटिंग रोप मिटर 100, आस्का लाईट 18 सह स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र असे 1200हुन अधिक स्वयंसेवकांचे रेस्क्यू फोर्स तैनात करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातही याच पद्धतीने प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा परिषदेची 80 हुन अधिक आरोग्य पथके, 1 हजार लाईफ जॅकेट्स, 11 फायबर बोट, रेस्क्यू व्हॅन सज्ज आहे. शिवाय अनेक ठिकाणी महापुराचा धोका आहे. त्या सर्वच नागरिकांना प्रशासनाने नोटीस पाठवून इशारा पातळी ओलांडताच स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातही पार पडली आढावा बैठक -
पावसाचा फटका सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसतो. त्यामुळे संभाव्य परिस्थितीला फटका बसू नये, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूर्वस्थितीत फ्रन्टलाइनवर कार्यरत राहावे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात पार बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. संभाव्य पूरस्थितीबाबत जिल्ह्यातील नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
वडनेरे समितीचा अहवाल काय सांगतो -
2019मध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये झालेल्या महाप्रलयानंतर सरकारने तज्ञांची एक समिती नेमली होती. त्यामध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासानंतर सादर केलेल्या अहवालात पुढील बाबींचा समावेश आहे.
- कृष्णा खोऱ्यातील विस्तृत पाणलोट क्षेत्रात अत्यल्प काळात झालेली सातत्यपूर्ण अतितीव्र पर्जन्यवृष्टी.
- पूर प्रवण भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती व नदीची रचना.
- पूर प्रवण क्षेत्रात म्हणजेच ज्या भागात पुराचा फटका बसतो त्या क्षेत्रात नागरीकरण, बांधकामे, अतिक्रमणे आदींमुळे पुर प्रवाहास अडथळे निर्माण होतात. शिवाय नदीपत्राचे त्यामुळे झालेले संकुचीकरण हे सुद्धा महत्वाचे कारण आहे.
- नद्यांमधील नैसर्गिक पुर वहन क्षमतेत झालेली घट.
- शहर व ग्रामीण भागातील पूर पाणी निचरा व्यवस्थेची खालावलेली परिस्थिती.
- धरणांतर्गत पूर सामावून घेण्याची खास वेगळी साठवण क्षमता नसल्यामुळे पुर नियमनात असलेल्या मर्यादा आणि इतर सूक्ष्म स्तरावरील कारणे सुद्धा याला जबाबदार आहेत.
- नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठले असून त्यामुळे नदीपात्र उंचावले असून ते अरुंद सुद्धा झाले आहेत.
- दोन्ही राज्यातील पुर नियंत्रण संदर्भात समन्वय महत्वाचे.