कोल्हापूर - आजचा बंद यशस्वी झाला आहे का ? हे विचार करण्यापेक्षा किती शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरलाच नाही. कारण, हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ज्यांना जिथं हवं तिथे आपला माल शेतकरी विकू शकतो -
केंद्रामध्ये केलेले कायदे शेतकरी हिताचे आहेत की नाही यावर काही महिने चर्चा सुरू आहे. बाहेरदेखील माल विकता यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. भाजीपाला बाहेर विकण्याच्या परवानगीचा कायदा महाराष्ट्रात आधीच झाला आहे. ज्यांना जिथे हवे तिथे आपला माल शेतकरी विकू शकतो. त्याला कोणाचा विरोधसुद्धा नाही. ऊसासाठी आधी झोन होता. त्यामुळे शेतकरी गुलाम बनला होता. मात्र, 1995 ते 99 दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी झोन बंदी उठवली. त्यानंतर शेतकऱ्यांना आपल्याला हवा तिथे ऊस विकता येऊ लागला, याचा दाखलासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार
....मात्र, कायदा रद्द होणार नाही -
हा कायदा शेतकरी हिताचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित पाहून यामध्ये जे जे बदल करायला हवेत ते बदल करता येतील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द होणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानमधील शेतकऱ्यांना माहिती आहे, हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले नाहीत, असेही पाटील यावेळी म्हणाले.
या आंदोलनाचा फटका भाजपला बसणार नाही -
देशभरात केंद्रा सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात जोरदार विरोध होत आहे. अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली होती. त्यामुळे भाजपला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात आगामी निवडणुकांमध्ये भाजपला याचा फटका बसेल असे वाटतंय का असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. शिवाय या आंदोलनाचा भाजपला कोणत्याही पद्धतीने फटका बसण्याचे कारण नाही. उलट याचा फायदाच होणार असल्याचे ते म्हणाले.