कोल्हापूर - कोल्हापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेले प्रतिपंढरपूर नंदवाळ हे एक धार्मिक स्थळ. या गावाला विठ्ठलाच्या वास्तव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गावास प्रतिपंढरपूर असे संबोधतात. याठिकाणी असणाऱ्या हेमांडपंती दगडी मंदिरात विठ्ठल रोज वास्तव्यास असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. तर जाणून घेऊया यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'च्या या स्पेशल रिपोर्टद्वारे.
नंदवाळ या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी याठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाय करवीर माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेखही मिळतो. त्यामुळे या ठिकाणास प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ येथे विठ्ठलाच्या संबंधित सर्व सण-उत्सव साजरे होतात. येथेही रिंगण सोहळा, दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अगदी पंढरपूर प्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्ताने गावात जय्यत तयारी केली जाते. काही दिवसांवरच ही यात्रा असल्याने गावात आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. याठिकाणी कोल्हापूरसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि विविध भागांमधून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात.
युगे बत्तीस विटेवरी उभा...
उभयांगी राई रखुमाई दिसे दिव्य शोभा...
सर्व भक्तांच्या भेटी परब्रह्म आले गा...
जय देव जय देव जय पांडुरंगा...
नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' असा उल्लेख केला आहे. परंतु, इथे युगे बत्तीस असा का उल्लेख याचा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचे कारण असे आहे, की ३२ युगापूर्वी नंदवाळ (नंदिग्राम) ३२ याठिकाणी पुंडलिक मातृ-पितृ सेवा करीत होता. त्याची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग याठिकाणी आले आणि त्यांनी येथेच वास्तव्य केले.
नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून ते दररोज मुक्कामासाठी, वास्तव्यासाठी विठ्ठल, राई (सत्यभामा), रखुमाई नंदवाळेमध्येच असतात. या तीनही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे. हे जागृत देवस्थान असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे आणि याचा प्रत्यय अनेकांना आल्याचे येथे बोलले जाते.
अनेकांना तर येथील विठ्ठल मंदिरात आणि पंढरपूरच्या मंदिरात काहीच फरक वाटत नाही. पांडुरंग जसा पंढरपुरात आहे तसाच येथे सुद्धा आहे. त्यामुळे आम्हाला येथे येऊन समाधान वाटते, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी येणारे भाविक व्यक्त करत असतात.
विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानला जातो. विठ्ठलाचे मूळ ठिकाण नेमके महाराष्ट्रात की कर्नाटक यामध्ये संशोधकांत मतभेद आहेत. शिवाय नंदवाळ येथील पांडुरंगाची उत्पत्ती नेमकी केव्हा झाली ? हे कोणालाही सांगता येत नाही. मात्र, करवीर माहात्म्य ग्रंथामधील सतराव्या अध्यायात ३२ युगे विठ्ठल, असे येथील विठ्ठलाला म्हटले आहे. तर, पंढरीचा पांडुरंग विठ्ठलाला नामदेवांनी त्यांच्या आरतीमध्ये २८ युगे म्हटले आहे. त्यामुळे चार युगे आधीपासूनच विठ्ठलाचे नंदवाळमध्ये वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे.