कोल्हापूर - भाडेकरूने दोन महिन्याचे भाडे दिले नाही म्हणून घरमालकाने भाडेकरूच्या घराकडे जावून धमकावले. तसेच हवेत गोळीबार करून भीती घालण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कर्नाटकमधील चिकोडी येथील रविवारी रात्री घडली.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले. अनेकांवर उपासमार आली. त्यासाठी घरमालकाना सध्या काही महिने घरभाडे घेऊ नये, अशाही सूचना दिल्या. मात्र, कर्नाटकमधील चिकोडी येथे भाडेकरूच्या घरासमोर जात भाडे दिले नाही म्हणून चक्क गोळीबार करण्यात आला. नूर अहमद शहापूर, असे गोळीबार करणाऱ्या मालकाचे नाव आहे. आर्थिक अडचणीमुळे राहिलेले भाडे पुढच्या महिन्यात देतो म्हणून भाडेकरूंनी सांगितले होते. मात्र, संतापलेला घरमालक नूर अहमद याने बंदुकीतून हवेत गोळीबार करून धमकी दिली आणि भाड्याची मागणी केली.
मालकाने गोळीबार केल्यामुळे घाबरलेल्या भाडेकरूंनी आरडाओरडा करून लोकांना गोळा केले. शिवाय घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. रात्रीची वेळ आणि गोळाबार केल्याचा आवाज मोठा असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेची नोंद चिकोडी पोलिसांत झाली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.