कोल्हापूर - राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. गावच्यागाव पाण्याखाली गेली आहे. तर अनेकांचे संसारदेखील उद्धवस्त झाले आहे. अशी काहीसी परिस्थिती कागल तालुक्यातील करनूर या गावातही आहे. मात्र, करनूर येथील रहिवासी सागर नलवडे घरावर आलेल्या संकटाची परवा न करता. रायगडमधील तळीये गावात बचावकार्य करत आहे.
कोल्हापुरातील 265 पेक्षा अधिक गावे पाण्याखाली -
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने कहर केला आहे. जिल्ह्यातील 265 पेक्षा अधिक गावं पाण्याखाली आहेत. तर सागर नलवडे राहत असलेले कागल तालुक्यातील करनूरदेखील पाण्याखाली आहे. सागरचे घरही पाण्याखाली गेले आहे. घरात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि सागरचा मुलगा राहतात. अशावेळी सागर रायगड जिल्ह्यातील तळीये येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावला आहे. काल दिवसभर सागर बचाव कार्यात होता. मात्र, इकडे घर त्याचे पाण्याखाली होते. सायंकाळी त्याला ही बातमी समजल्यानंतर सागरच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कॉलवरून संपर्क साधल्यानंतर घरचे सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सागरसोबत 'ईटीव्ही भारत'ने संपर्क केला असता, त्यांनी ही हकीकत सांगितली. करनूर गावात पाणी येईल, असे वाटले नव्हते. तळीये गावात जी दुर्घटना घडली. त्यांना वाचवण्याच्या आशेने मी इकडे पोचलो होतो. अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशी प्रतिक्रिया सागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
'मृतदेह बाहेर काढताना घरच्यांची आठवण' -
गेल्या दोन दिवसांपासून सागर तळीये येथे मदत कार्य करत आहेत. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या घराच्या मातीतून एक-एक मृतदेह बाहेर काढत आहे. मात्र, हे करत असताना त्यांना प्रत्येक क्षणी आपल्या घरच्या लोकांची आठवण येत आहे. त्यामुळे व्याकूळ झालेल्या सागर यांना घरातील लोकांची आस लागली आहे.
तळीये गावासाठी आर्थिक मदत -
गेल्या चार दिवसांपासून सागर दुर्घटनाग्रस्तांना मदत करत आहेत. या गावातील लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सागर काम करत असलेल्या 'एडवेंचर ऑफ इंडिया' या संघटनेच्यावतीने आर्थिक मदत गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या या उपक्रमाला राज्यभरातून आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे गाव नव्याने वसवण्यासाठीदेखील या टीमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती सागरने दिली आहे.
'सागर'कडून १६ मिनिटांत लिंगाणा सर -
सागर नलवडे यांची साहसी गिर्यारोहक म्हणून राज्यभरात ओळख आहे. सह्याद्रीतील एकही खिंड, दुर्ग, किल्ला नसेल ज्या ठिकाणी सागर गेले नसतील. त्यामुळे सागर यांना सह्याद्रीची चांगली माहिती आहे. नेहमी ये-जा असल्याने त्यांनी सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्याची जवळून पाहिल्या आहेत. रायगडजवळ असणारा लिंगाणा सुळक्याची त्यांनी कोणतेही साहित्य न घेता 16 मिनिटात चढाई केली आहे. त्यामुळे आपत्ती क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईत नोकरीसाठी वास्तव्यास होते. पण कोरोनामुळे सध्या आपल्या पत्नी आणि लहान मुलांसह करनुर येथे राहत आहेत.
हेही वाचा - VIDEO : महाड दुर्घटना : सरकार यातून काही बोध घेणार का?