कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापुरात निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाजी चौक येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचे पोस्टर जाळण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सदावर्ते यांनी केलेले वक्तव्य मागे घेऊन त्यांनी छत्रपती घराण्याची माफी मागावी अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भावना संपूर्ण कोल्हापुरातून उमटत आहे.
खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी झटत आहेत. न्यायिक लढाई लढत असताना त्यांच्याकडून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सुरू आहे. मात्र ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार संभाजीराजे यांना अफजलखानाची उपमा दिल्याने समस्त कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या आहेत. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजी चौक येथे सदावर्ते यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तब्बल साडेचार फुटांची पायतान घेऊन यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, ॲडव्होकेट सदावर्तेचा निषेध असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, आधीच आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा समाज अनेक दिवसांपासून संघर्ष करत असताना त्यांचा संयम सुटत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदावर्ते यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : गच्चीवरील भात शेतीचा यशस्वी प्रयोग; कोल्हापूरच्या अवलियाने साधली किमया