कोल्हापूर - निगवे खालसा गावचे हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्यावर आज त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जवानांना 3-4 महिन्यांनी तरी सुट्टी द्या, त्यांना 9-9 महिने वाट पाहायला लावू नका, अशी आग्रही मागणी वीरपत्नी हेमलता पाटील यांनी केली. तसेच पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय शांत बसू नका, हीच माझी शेवटची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटलं. यावेळी वीरपत्नी हेमलता पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश जनसमुदयाचे मन हेलावून टाकणारा होता. काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यांनी केलेल्या हल्ल्यात संग्राम यांना वीरमरण आले.
पुढच्या महिन्यात संग्राम गावी येणार होते -
संग्राम पाटील यांची कुटुंबीयांशी शेवटची भेट फेब्रुवारी महिन्यात झाली होती. ड्युटीवर गेल्यानंतर ते परतले नव्हते. पुढच्या महिन्यात ते आपल्या गावी परतणार होते. याबाबत त्यांनी गावातील मित्रांना आणि भावाला फोनवरून माहिती दिली होती. मात्र, पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावातील पहिलाच जवान शहीद -
निगवे खालसा गावातील जवळपास 100 जवान आजपर्यंत देशसेवेत दाखल झाले आहेत. त्यातील 10 ते 15 जवान सेवानिवृत्त झाले असून अजूनही 80 हून अधिक जवान देशसेवेसाठी कार्यरत आहेत. मात्र, संग्राम पाटील हे पहिलेच जवान आहेत. ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. संग्राम यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संग्राम पाटील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन, मुले असा परिवार आहे. एकाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्याची ही दुसरी घटना आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एकाच महिन्यातील दुसरी दुर्दैवी घटना-
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात नुकतेच कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातले ऋषिकेश जोंधळे हे जवान हुतात्मा झाले होते. त्यांनतर लगेचच संग्राम पाटील हे जवान शहीद झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.