कोल्हापूर - कोरोना बाधितांवर आठ दिवस खासगी रुग्णालयात उपचार करून शेवटच्या 48 तासात सरकारी रुग्णालयात दाखल केले तर अशा खासगी रुग्णालयांना नोटीस काढण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. काही खासगी रुग्णालये असा प्रकार करुन सरकारी रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण दाखवत असल्याचे निदर्शनाला आले असल्याने सतेज पाटील यांनी हा इशारा दिला.
ग्रामीण-शहरी भागात अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात असतात. या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना आरटीपीसीआर टेस्टे करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, तरीदेखील काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत. त्यावर थेट रुग्णांकडून माहिती घेऊन अशा खासगी रुग्णालयांना नोटीस काढण्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला.
हेही वाचा - रियालिटी चेक - व्हायरल झालेल्या कोल्हापुरातील 'त्या' चिमुकल्याच्या व्हिडिओमागील सत्य
कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. शेवटच्या 24 ते 48 तासांतील मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. काही खासगी रुग्णालये आठ दिवस उपचार करून शेवटच्या 48 तासांत सरकारी रुग्णालयात रुग्ण पाठवा, अशा सूचना देतात. त्यामुळे काही रुग्ण दगावत असल्याचे समोर येत आहे. आठ दिवस उपचार करून शेवटच्या वेळी रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरळीत व्हावेत तसेच शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात दाखल करून 'सरकारी रुग्णालयात मृत्यू' असे दाखवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. असे प्रकार खासगी रुग्णालयाकडून होत आहेत. त्यामुळे आता थेट जिल्हा प्रशासन त्यांना थेट नोटीस काढणार असल्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला.
छत्र हरवलेले पाल्यांना जिल्हा प्रशासन घेणार दत्तक -
कोरोनामुळे अनेक मुलांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले. त्यांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी कोण करणार? असा प्रश्न आता समाजात निर्माण होऊ लागला आहे. कोरोनाने मुलांचे केवळ आई तर कुणाचे वडील हिरावून घेतले. तर कोणाचे आई-वडील मृत्यू पावले. त्यामुळे यांच्या पालनपोषणाची जबाबदारी कोण करणार? असे सामाजिक प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कणेरी वाडी येथील सिद्धगिरी मठाच्या वतीने अशा अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याचे जाहीर केले होते. तर आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हेही वाचा - 'कोल्हापूर एमआयडीसीतील उद्योजकांना लॉकडाऊनदरम्यान विजेचा किमान आकार रद्द करा'
कोल्हापूर जिल्ह्यात 45 मुलांचे आई किंवा वडील नसल्याचे समोर आले आहे. तसेच दोन मुलांचे आई-वडील असे दोन्ही हिरावून घेतल्याचे समोर आले आहे. अशा मुलांची पालनपोषणाची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन घेणार आहे. त्यांच्या शिक्षणासह पालनपोषणाची जबाबदारी जिल्हा प्रशासन घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. वेळ पडल्यास त्यांना जिल्हा प्रशासन दत्तक ही घेणार असल्याची तयारी केली जात आहे. तसेच आणखी माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत.