कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे पत्नीचा वाढदिवस साजरा करू शकले नाहीत, आपल्या पत्नीला काहीही भेट देऊ शकले नाहीत. पण हाच वाढदिवस आयुष्यभर लक्षात रहावा, यासाठी माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक गाणं म्हटलंय. त्यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया साईट्सवर पोस्ट केला आहे.
धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांचा 1 मे रोजी वाढदिवस होता. पण लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. शिवाय काही भेट सुद्धा देता आली नाही. त्यामुळे अरुंधती महाडिक यांना अनोखी भेट द्यायचे त्यांनी ठरवले आणि 'जब कोई बात बिगड जाये, जब कोई मुश्कील पड जाये.. तुम देना साथ मेरा.. ओ हमनवाज..' हे रोमँटिक गाणं त्यांच्यासाठी म्हटले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वाढदिवसासाठी केकही घरच्या सगळ्या मंडळींनी घरीच बनविला होता.
महाडिक यांच्या मुलांनी सुद्धा वाढदिवसानिमित्त अत्यावश्यक सेवा देत असलेल्या व्यक्तींना सॅनिटायझर, मास्क आणि एक छोटं वृक्ष भेट म्हणून दिले. चिरंजीव कृष्णराज महाडिक याने आईचा वाढदिवस कसा साजरा केला, यावर एक व्लॉग सुद्धा बनवला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सुद्धा घरच्या सर्वच व्यक्तींनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील असाच होता, असे अरुंधती महाडिक यांनी म्हटले आहे. शिवाय सर्वांनी घरीच रहा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.