कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्णय घेतला. 15 सप्टेंबरपासून ते 25 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणीकरून त्यांना आरोग्यशिक्षण देण्याबाबत ही मोहीम आहे. याची जबाबदारी राज्यातील आशा वर्कर्सला देण्यात आली. मात्र, अद्याप सर्वेक्षणाचे साहित्यच उपलब्ध झाले नसल्याचे अशा वर्कर्सकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे साहित्य उपलब्ध झाल्यावरच काम करू, अशी भूमिका कोल्हापुरातल्या शिरोळ भागातील आशांनी घेतली. आशा वर्कर्स युनियनच्यावतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले आहे.
घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिरोळ गाव व शिरोळ उपकेंद्राअंतर्गत आशा वर्कर्स काम करतात. शासनाच्यावतीने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'च्या सर्वेक्षणासाठी लागणारे साहित्य अद्याप उपलब्ध झालेले नाही. यामध्ये ऑक्सिपल्स मीटर, थर्मल स्क्रीनिंग उपकरण, स्टिकर्स, प्रसिद्धीपत्रक रजिस्टर, फॉरमॅट, टी शर्ट हे साहित्य व तीन लोकांच्या टीमचे नियोजन करून देणे आवश्यक आहे. शासनाकडून हे सर्व अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय सर्वेक्षण करणार नाही, अशी भूमिका सर्वच आशा वर्कर्सनी घेतली असल्याची माहिती आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिली.