कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री. अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी आज, शुक्रवारी मावळत्या सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. श्री. अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा ( Kironotsav Ceremony in kolhapur ) पार पडत असतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात तर दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो.
किरणोत्सव सोहळा - आज, सायंकाळी ४ वाजून ५९ मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वार मधून मंदिरात आली आणि ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केले आणि ५ वाजून ४६ मिनिटांनी किरणांनी देवीच्या कंबरेला स्पर्श करत ५ वाजून ४७ मिनिटांनी सूर्याची किरणे श्री अंबाबाईच्या गळ्याला स्पर्श करत ठीक ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्य किरण हे देवीच्या चेहऱ्यावर आले आणि लुप्त झाली. यानंतर देवीची आरती करण्यात आली आणि श्री अंबाबाई देवीची अलंकार पूजा करण्यात आली.
भाविकांना दर्शनाचा लाभ - किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिर आवारामध्ये सीसीटीव्ही नियंत्रकक्ष यांच्या लाईव्ह कॅमेऱ्याच्या सोर्समधून किरणोत्सवचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर देण्यात आलेला होता. मंदिर आवारामध्ये नगारखाना शेजारी तसेच सिद्धिविनायक मंदिर शेजारी भव्य एलईडी स्क्रीन किरणोत्सो पाहणे करिता भक्तांच्या सोयी करता उभा करण्यात आलेला असून याचा भाविकांनी अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेतला. मंदिर आवारा बरोबर मंदिराच्या बाहेर देखील भवानी मंडप परिसर याठिकाणी देखील एलईडी स्क्रीन उभा करण्यात आलेली असल्याने श्री आई अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविकांनी येथे गर्दी केली होती.
असा होता किरणोत्सवाचा कालावधी - महाद्वार कमान ४ वाजून ५९ मिनिटे, गरुडमंडप पाठीमागे 5 वाजून 3 मिनिटे, गरुड मंडप मध्यभागी 5 वाजून 07 मिनिटे, गणपती पाठीमागे 5 वाजून 21 मिनिटे, कासव चौक 5 वाजून 32 मिनिटे, पितळी उंबरा 5 वाजून 34 मिनिटे, चांदीचा उंबरा 5 वाजून 38 मिनिटे, गर्भ कोटी 5 वाजून 40 मिनिटे, चरण स्पर्श 5 वाजून 44 मिनिटे, कमरेपर्यंत 5 वाजून 46 मिनिटे, गळ्यापर्यंत 5 वाजून 47 मिनिटे, चेहऱ्यावर 5 वाजून 48 मिनिटे असा किरणोत्सवाचा सोहळ्याचा कालवधी होता.