कोल्हापूर- कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीशिवाय प्रवेश देण्यास कर्नाटक सरकारने मनाई केली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने सीमाभागात अद्याप कोणतीही तपासणी यंत्रणा सुरू केली नाही. एवढचं काय तर कर्नाटकातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कोगनोळी (बेळगाव) भागातून येणाऱ्या नागरीकांचीही कोरोना तपासणी न करता त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना बधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आव्हानात्मक बनणार आहे.
राज्यासह देशात कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात २ लाख १७ हजार ३५३ इतक्या नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार १५८ जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला तर गेल्या चोवीस तासात राज्यात ६३ हजार ७२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९८ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ३७ लाख ३ हजार ३५४ इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सध्या ६ लाख ३८ हजार ३४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. गेल्या चोवीस तासाचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास केला तर सर्वाधिक कोरोना बाधितांची वाढ आणि मृत्यूचे प्रमाण हे महाराष्ट्रात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र राज्याच्या सीमेवर कोणतीच नियंत्रण यंत्रणा सुरू केली नसल्याचे चित्र आहे.
ब्रेक द चेन म्हणजे 'आतील बंद आणि बाहेरील चालू'
राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने ब्रेक द चेंन या नियमानुसार अत्यावश्यक सेवा आणि परवानगी मिळालेल्या दुकानांशिवाय इतर व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही. तर दुसरीकडे राज्याच्या सीमा खुलेआम सोडून बाहेरील नागरिकांना आत प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यावरूनच 'ब्रेक द चेन' म्हणजे आतील बंद आणि बाहेरील चालू अशीच गत राज्याची झाली आहे.
कर्नाटकात आरटीपीसीआर चाचणीशिवाय प्रवेश नाही
कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्नाटक राज्य सरकारने राज्याच्या सीमाभागात चेकपोस्ट सुरू केले आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. जर प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट नसेल तर त्यांना परत माघारी पाठवण्याची भूमिका कर्नाटक सरकारने घेतली आहे.
महाराष्ट्रात खुलेआम प्रवेश
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार कडक पावले उचलण्याबाबत वारंवार भूमिका व्यक्त करत आहे. मात्र, त्याबाबतची अंमलबजावणी करताना दिसत नाही. राज्यात संचारबंदी लागू असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर खुलेआम फिरत आहेत. तर दुसर्या बाजूला इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अशा प्रवाशांवर कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. शिवाय त्या वाहनांची नोंद देखील राज्य सरकारकडे राहत नाही. त्यामुळे भविष्यात इतर राज्यातून येणारे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करणार? हे राज्य सरकारसमोर आव्हान असेल.