कोल्हापूर - चांगभलंचा गजर आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्रवाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा आज उत्साहात संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश याठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. या यात्रेच्या निमित्ताने अखंड वाडी रत्नागिरी गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघाली आहे.
आज चैत्र्य यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर अक्षरश: फुलून गेला होता. सासनकाठी नाचविताना हलगी घुमक, कैताळ, झांज ढोल, ताशाच्या गजराने डोंगरालाही ताल धरायला लावला. जोतिबाच्या भक्तीत लीन झालेले भक्त वाद्यवृंदाच्या निनादात देहभान विसरून सासनकाठ्यांचा समतोल साधत नृत्य करत होते. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार सतेज पाटील, आमदार सत्यजित पाटील याच्या उपस्थितीत मानाच्या सासन काठ्यांचे पूजन झाले. सर्वाना सुख आणि चांगले अरोग्य लाभू दे, असे साकडे सतेज पाटलांनी जोतिबाच्या चरणी घातले.
पहाटे शासकीय पूजा, अभिषेक झाल्यानंतर जोतिबाचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावून जोतिबाचे दर्शन घेतले. दुपारी मानाच्या सासनकाठ्यांची पूजा करून सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सासनकाठ्यांची मिरवणूक जोतिबा मंदिर ते यमाई मंदिपर्यंत जाते. यामध्ये मानाच्या निनाम पाडळी, किवळ, विहे, कसबे डिग्रज, करवीर संस्थान, कसबा सांगाव, किवळ, मोजेवाडी रत्नागिरी, कोडोली, मनपाडळे, फाळकेवाडी, दरवेस पाडळी, विठ्ठलवाडी, बागणी, आष्टा यांसह शंभरावर सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी यात्रेसाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून यात्रेसाठी जोतिबाच्या डोंगरावर आलेल्या भाविकांनी श्री दर्शन, दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक आणि सायंकाळी पालखीचे दर्शन घेऊन आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करून परतीचा मार्ग धरला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटक आंध्रप्रदेश येथून लाखोभाविकांनी दख्खनच्या राजाचे दर्शन
यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त आणि सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. पोलीस, होमगार्ड, एसआरपी, व्हाईट आर्मी आणि सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक भाविकांच्या रांगा लावून सर्व व्यवस्था पाहत होते. बाहेरगावावरून आलेल्या भाविकांनी येथील श्री महालक्ष्मीचे आणि करवीर दर्शनाचा लाभ घेतला.