कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातल्या कुंभोज येथील वसंत कांदेकर या शेतकऱ्याने शाहूवाडी तालुक्यातील अथणी शुगर युनिट हे वजनाने तफावत करत असल्याचे जय शिवराय किसान संघटनेच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार संबंधित कारखान्यावर भरारी पथकामार्फत तपासणी केल्यानंतर तिथे अधिकाऱ्यांना अनियमितता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कारखान्याने गुन्हा मान्यता करत लावलेला 80 हजारांचा दंड भरला आहे. कारखान्याने काटामारीतुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनातील तफावत केलेली रक्कम संबंधित कारखान्याकडून वसूल करून मिळावी तसेच अतनी शुगर युनिट वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. गुन्हा दाखल नाही झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण ? - जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी 2000 22 रोजी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज मधील शेतकरी वसंत कांदेकर यांनी शाहूवाडी तालुक्यातील अथणी शुगर येथे उसाच्या वजनात तफावत होत असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत संबंधित विभागाला माहिती देऊन कारखान्यावर छापा टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार छापा टाकून तपासणी केली असता अधिकाऱ्यांना वाजनामध्ये तफावत आढळली होती. त्यानुसार संबंधित कारखान्यावर 80 हजारांचा दंड ठोठावला होता. संबंधित कारखान्याने हा दंड भरला असून एका अर्थाने त्यांनी हा गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे या हंगामात आजपर्यँत या कारखान्यात साडे तीन लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. एकट्या वसंत कांदेकर यांच्या 16 ते ते 17 टन ऊसामध्ये 1200 किलोचा फरक आढळून आला होता. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण साडेतीन लाख टन गळापातील फरक सुद्धा संबंधित शेतकाऱ्यांना वसूल करून घ्यावा. ही रक्कम जवळपास 7 ते 9 कोटी इतकी होते असेही संघटनेचे नेते माने यांनी म्हंटले आहे.
तफावतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा - संबंधित कारखान्याने वजनात फरक करून शेतकऱ्यांची लूट केली आहे. शिवाय, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यानुसार कारखाना प्रशासनावर गुन्हा दाखल करावा तसेच वजनात तफावत आढळल्यानंतर सुद्धा वजन मापक निरीक्षकांनी सदर वजन काटा सुस्पेंड करणे गरजेचे होते परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. त्यामुळे त्यांचे हेतूवर सुद्धा शंका निर्माण होत आहे. त्यामुळे वजन मापक निरिक्षक यांच्यावरही कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन ही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.