कोल्हापूर - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर शहराजवळ २ ट्रक गुटखा जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. गुटख्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महामार्ग पोलिसांची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.
राज्यामध्ये गुटखा आणि पानमसाला विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा खाण्याचे व्यसन वाढले आहे. या अनुषंगाने कोल्हापूर महामार्ग पोलिसांनी उजळाईवाडी येथे वाहन तपासणी नाका उभारला होता. यावेळी वाहन तपासणी दरम्यान वाहतूक पोलिसांना २ ट्रकचा संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता हिरा पान मसाल्याची पोती आढळली.
यावेळी अहमदनगरचा सलमान अमितखान आणि औरंगाबादचा परवेज अजीज उल्लाखान या दोन्ही ट्रक ड्रायव्हरला वाहतूक पोलिसानी ताब्यात घेतले आहे. या गुटख्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.