कोल्हापूर - दिवसेंदिवस कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील हे उद्या (शुक्रवार) सकाळी 10 वाजता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत काही चर्चा होते का? हे सुद्धा पाहावे लागणार असून, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापुरात जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 541वर पोहोचली असून, त्यातील 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 585वर पोहोचली आहे. 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यात केवळ 34 रुग्ण उरले होते. शिवाय जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी सर्वांना अशा वाटत असतानाच पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली. ती आता 585 वर पोहोचली आहे. शिवाय जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर राज्यात सर्वात चांगले होते. हे प्रमाण यापुढेही असेच कायम ठेवण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याबाबत मागणी वाढत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या त्याचबरोबर मृत्यू, उपचारपद्धती, रूग्णालयांची व्यवस्था, आरोग्य साधनसामुग्रींचे नियोजन, प्लाझ्मा थेरेपी एकूणच जिल्ह्याची सद्यस्थिती याबाबत पालकमंत्री जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्याशी संवाद साधणार आहेत. या बैठकीसाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे.