कोल्हापूर- पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल शाहूपुरी कुंभार गल्ली येथे भेट देत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. जिल्हा प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मात्र, कोणत्याही क्षणी पाणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात यावा, अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पाटील यांच्याबरोबर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सुद्धा उपस्थित होते.
गेल्यावर्षी शाहूपुरी कुंभार गल्लीत महापुराचे पाणी दोन दिवस साचले होते. त्यावेळी कुंभार समाजाचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांच्या गणेश मूर्त्या पाण्यात खराब झाल्या होत्या. यावेळी ती परिस्थिती ओढवली जाऊ नये यासाठी गणेशमूर्ती सुरक्षित स्थळी नेण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरिकांना केल्या. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण उपस्थित होते.
एनडीआरएफच्या 2 तुकड्यांना पाचारण
कोल्हापूर परिसरात दिवसभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या 2 तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
हेही वाचा- कोल्हापुरात स्थलांतर सुरू; चंदगडच्या कोवाड बाजारपेठेत पाणी घुसले, जनजीवन विस्कळीत