कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात पूरग्रस्तांना दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात पुन्हा वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे पूरग्रस्त नागरिक संतप्त झाले असून गावात तणावाचे वातावरण आहे.
रांगोळी गावाला मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका बसला होता. त्यानंतर, गाव पूरग्रस्त घोषित करून सर्व ग्रामस्थांना 5 हजारांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पूरग्रस्त आणि पुरबात या शब्दरचनेत प्रशासन अडकल्याने हे पैसे नागरिकांकडून पुन्हा वसूल करण्यात आले. विषेश म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हे पैसे वसूल करण्यात आले त्यामुळे नागरिक जास्तच संतापले आहेत.
प्रशासनाने सर्वेक्षण न करता मदत दिल्याने हा गोंधळ उडाल्याची चूक कबूल केली आहे. पुन्हा सर्वेक्षण करून मदत दिली जाईल असेही अधिकारी म्हणत आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूरग्रस्त भागात मनमानी पद्धतीने निधीचे वाटप होत असेल तर, त्यावर प्रशासनाचा योग्य अंकुश असावा अशी मागणी नागरिक करत आहेत.