कोल्हापूर - कोरोनामुळे गोकुळच्या एका ठरावधारकाचा मृत्यू झाला आहे. सुभाष सदाशिव पाटील (वय ५४), असे ठरावधारकाचे नाव असून ते कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील 'कै. सदाशिव पाटील दूध संस्थे'चे ठरावधारक होते. गोकुळसाठी 2 मे रोजी मतदान होणार आहे. त्याअगोदर पाटील यांचे निधन झाल्याने ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोनामुळे गोकुळच्या ठरावधारकाचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. हा कोरोनाचा बळी नसून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हट्टाचा बळी असल्याची टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. गोकुळची निवडणूक होण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या काही संस्था न्यायालयात पाठवल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्थगित करण्यात यावी, अशी भूमिका काही ठरावधारकांची होती.
मात्र, उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाला दिले होते. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात कोरोनाची परिस्थिती कमी आहे. तसेच योग्य काळजी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडू, असा हट्ट केल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असे माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले.
मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात -
2 मे रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सत्तारुढ गटासमोर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मिळून जाहीर केलेल्या राजर्षी शाहू आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. गेल्या वेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांनी अनेकांचा पाठिंबा नसून सुद्धा सत्तारुढ गटाला टक्कर दिली होती. मात्र, आता सत्तारुढ गटातील अनेक संचालक फुटून विरोधी बाकावर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच रंगत आली असून आता हालचालींना वेग आला आहे.