कोल्हापूर - करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज (सोमवारी) त्यांच्या गावी वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.गेल्याच सोमवारी कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले होते. ही ताजी घटना असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात ही दुसरी घटना घडली.
गावातीलच एका शाळेच्या मैदानावर आज शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी संपूर्ण तयारी केली होती. अंत्यविधीच्या ठिकाणी चबुतरा बांधण्यात आला. शिवाय याठिकाणी मंडप सुद्धा घालण्यात आला आहे. गावामध्ये सर्वांकडून डिजिटल फलकांच्या माध्यमातून संग्राम पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनीसुद्धा तयारीची पाहणी करून ग्रामस्थांना विविध सूचना दिल्या होत्या.
राज्य सरकारकडून 2 कोटी रुपये -
राज्य सरकारकडून या वीरजवान संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
सर्वात आधी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते वीर जवान संग्राम पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल, माजी आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.
दरम्यान, याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. तसेच 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या.
21 नोव्हेंबरला आले वीरमरण -
21 नोव्हेंबरला पहाटे काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी केलेल्या हल्ल्यात संग्राम यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. संग्राम पाटील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पाठिमागे आई, वडील, भाऊ बहीण, पत्नी, दोन, मुले असा परिवार आहे. एकाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पुढच्या महिन्यात संग्राम गावी येणार होते..
संग्राम पाटील यांची कुटुंबियांशी शेवटची भेट फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर ते ड्युटीवर गेले होते. त्यानंतर ते परतले नव्हते. पुढच्या महिन्यात ते आपल्या गावी परतणार होते. याबाबत त्यांनी गावातील मित्रांना आणि भावांना फोनवरून माहिती दिली होती. मात्र पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन बांधलेले घर पाहायचं स्वप्न अधुरेच -
संग्राम यांचे घराचे काम सुरू होते. फोनवरून माहिती घेऊन काम कुठपर्यंत आलं आहे याची ते माहिती घेत होते. मात्र, शेवटी बांधलेलं घर पाहण्याचं राहूनच गेलं, अशी खंत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.