कोल्हापूर - दूध दरवाढीबरोबरच विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा अनेक ठिकाणी भडका उडाला आहे. हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले आहे, तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर पाठवले जात आहेत. राधानगरी तालुक्यातील कौलव गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांना मोफत दुधाचे वाटप केले. जवळपास 5 हजार लिटर दुधाचे गावात वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये संकलन केलेल्या दुधाचे अशा पद्धतीने वाटप केले जात आहे, तर अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन होत आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. शिवाय आपल्या गावातील ग्रामदैवताला दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून शेतकर्यांनी एक दिवस दूध संकलन करू नये, असे आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा न येता गोरगरीबांना दूध मोफत वाटा. मात्र, दुधाची नासाडी करू नका, असे आवाहन शेट्टींनी केले होते. त्याला प्रतिसाद देत कौलवमधील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांना मोफत दुधाचे वाटप केले.