कोल्हापूर- कर्नाटक सरकारने शिवसेनेला सीमेवर रोखले असले तरी, अखेर शिवसेनेने कर्नाटकात जाऊन भगवा फडकवला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोणेवाडी गावात शिवसेनेने भगवा फडकवला आहे.कर्नाटक सरकारने गुंडगिरी करून शिवसेनेला मागे हटवले असले, तरी कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महाराष्ट्रात सामील केल्याशीवाय शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरी शिनोळी गावात कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झाला. मात्र, कोल्हापुरातील शिवसैनिकानी बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवला.
काय आहे प्रकरण -
काही दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा ध्वज बेळगाव महानगरपालिकेसमोर लावला होता. याला विरोध करत मराठी भाषिकांनी आंदोलन छेडले होते. हा ध्वज त्वरित काढून घ्यावा, यासाठी बुधवारी बेळगावमध्ये मोठा मोर्चा निघणार होता. मात्र, या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने तो स्थगित झाला. त्यामुळे आता कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावकडे रवाना झाले होते.
काय आहे सीमावाद -
१७ जानेवारी १९५६ मध्ये बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे १० सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते.