कोल्हापूर- इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावितअसणाऱ्या सुळकुड पाणी योजनेला गट-तट बाजूला ठेवून सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. ही योजना रद्द होईपर्यंत नेटाने लढा देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुळकुड योजना रद्द करण्यासाठी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केलीये. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड व कागल या सहा तालुक्यातील शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.
शेतकऱ्यांनी आपले प्रश्न आणि उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर मांडल्या. काळम्मावाडी धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. आम्हाला अजून पाणी पुरत नाही. तरीही हे पंचगंगा प्रदुषित करुन दूधगंगेतील पाणी मागत आहेत. ते आम्ही कदापिही देणार नाही. वारणावरुन योजना का झाली नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे असेही अनेक शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले.
सुळकुड पाणी योजना झाल्यास शिरोळ तालुक्यातील नऊ गावांच्या पिण्याच्या व पाच गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार सुद्धा शिरोळ मधील शेतकऱ्यांनी केला. शिवाय वारणेच्या शेतकऱ्यांचा विरोध बघून दूधगंगेवर ही योजना रेटण्याचा प्रयत्न हाणून पाडूया, असा निर्धार करणयात आला. सर्व शेतकऱ्यांनी यावेळी आपले प्रश्न समरजितसिंह घाटगेंसमोर मांडले आणि घाटगे यांनी यामध्ये पुढाकार घ्यावा यासाठी निवेदन दिले.
दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली काल कोल्हापूरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या बैठकीला इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अल्का स्वामी, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक मदन कारंडे आदींची उपस्थिती होती. कागल तालुक्यातील सुळकुड पासून जवळच दुधगंगा नदीवर बंधारा बांधून याठिकाणाहून पाणी उपसा करण्यात येणार आहे. मात्र, या पाणी योजनेचे राजकारण करू नका,असे आवाहन इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले होते. मंत्री सतेज पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार आणि सर्व आमदार यांच्या सोबत एकत्रित बैठक घेऊनच याबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाईल, असे खासदार माने यांनी कालच्या बैठकीनंतर म्हटले होते. त्यामुळे आता इचलकरंजीला पाणी पुरवठा करण्यावरून आता भाजप विरुद्ध सेना असे चित्र पाहायला मिळत असून येणाऱ्या काळात काय होणार हे पाहावे लागणार आहे.