कोल्हापूर- वीज बिलाची वसुली करताना, थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये अशा सूचना महावितरण कंपनीला द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-व्यवसाय बुडाले आहे. तर अनेकांची नोकरी गेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. आर्थिक अडचणींवर मात करीत, जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना सरकारने दिलासा देणे गरजेचे आहे असेही या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे.
व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा द्या
ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करण्याचे व घरगुती वीज बिल माफ करणार, असा निर्णय आपल्या महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी वीज प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील औद्योगीक वीज ग्राहाकांचे स्थिर आकार रद्द करणे. तसेच घरगुती वीज बिल माफ करण्याबाबतचा निर्णय होईपर्यत थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये. अशी मागणीही आमदार जाधव यांनी निवेदनातून केली आहे.
हेही वाचा-महाविकास आघाडीविरोधात भाजपचे सोशल वॉर! गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी