कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्गात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ञांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय 'टास्क फोर्स'ची स्थापना शुक्रवारी करण्यात आली. याबाबतचे आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत लहान मुलांसाठी आवश्यक १५० ते २०० नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
सीपीआरमध्ये यापूर्वी १५ नवे व्हेंटिलेटर घेतले आहेत. त्यात आणखी १० वाढवण्यात येणार आहेत. यासह सीपीआरमध्ये ५० आयसीयू बेड, आयजीएम इचलकरंजी येथे १० तर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात १० ते १५ बेड वाढवण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग तज्ञ प्रा.डॉ. संगीता कुंभोजकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतींना स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभा करण्याच्या सूचना -
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींना स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोरोना बधितांकडे स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र स्वच्छतागृह नसेल तर त्यांना गावातीलच 'इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात येईल. जिल्ह्यात १५० गावांत आयसोलेशनची सुविधा उभारली आहे. त्यालाही मान्यता देण्यात येईल. अन्य गावांनीही अशी सुविधा उभारावी. १७ व्या वित्त आयोगातून त्यासाठी निधी खर्च करण्याची परवानगी आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना मृत्यूंचे ऑडिट करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याद्वारे आलेल्या अहवालात उपचारासाठी उशिरा दाखल झाल्याने मृत्यू झालेल्यांची रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. गंभीर रुग्णांना शासकीय रुग्णालयात न पाठवण्याबाबत खासगी रुग्णालयांना सूचित केले आहे. सर्व सुविधा असतानाही रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवल्याचे निदर्शनास आले तर संबंधित रुग्णालयावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा- स्वागतासाठी बुके घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी खडसावले