कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 20 ते 25 हजार हेक्टर भात आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. ऊस, भुईमूग, भात, भाजीपाला, सोयाबीन, नागली, ज्वारी, अशी पिके हाती लागण्याची वेळ आली असताना परतीच्या पावसाच्या माऱ्याने ती जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर मोठं अस्मानी संकट आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 25 ते 30 टक्क्यांनी कृषी उत्पादनाला तडाखा बसला आहे. ऑगस्ट महिन्यातील महापुराने आधीच शेतकऱ्यांसह सर्वांचे कंबरडे मोडले होते. महापुरावेळी हजारो हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले-सुरले अस्तित्व पुसले गेल्याचे चित्र आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या 15-20 दिवसांत तुरळक पाऊस होतो. तो रब्बीसाठी पोषक असतो; मात्र, यंदा पावसाचे काही वेगळेच रूप पाहायला मिळाले. महापुराने नदीकाठासह इतर पिके कुजून गेली. कष्टाने पिकविलेली पिके आता काढणीस आली असतानाच परतीच्या पावसाने एकसारखा रपाटा लावला. रोज ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने काढणी थांबली त्यामुळे भात, भुईमुगाला, मक्याला कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. भाताच्या लोंब्यांतून दाणे तुटून खाली पडत आहेत; तर ज्वारीची कणसे काळी पडू लागली आहेत. दाणे पोकळ पडण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील 50 टक्के भात शेती सतत पडणार्या पावसाच्या पाण्याने कुजून गेली आहे. पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ भात शेतीत पाणी असल्याने ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. भात झाडल्यानंतर राहणारे पिंजर कुजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. सोयाबीन, भुईमूग, ज्वारीचे किमान 30 ते 40 टक्के उत्पादन कमी होणार आहे. नदीकाठावर शेती गेलीच, आता डोंगराचेही पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी खायचे काय, हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास 20 ते 25 हजार हेक्टर भात आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.