कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हसन मुश्रीफ अजित पवार गटासोबत गेले. मात्र, भाजपासोबत जाणं हे विकासासोबत जाण आहे, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे. ही प्रतिक्रियाच मुळात हास्यास्पद असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझी आणि मुश्रीफ यांची तुलना करायची असेल तर मुश्रीफ हे गेली 18 वर्षे मंत्री होते. मी विकासासाठी तिकडे गेलो हे म्हणणं किती हास्यस्पद आहे. गेली 18 वर्षे मंत्रीपदावर बसून त्यांनी काय केलं? शरद पवार यांनी त्यांना काय दिलं नाही? ते कोल्हापूरला आले की त्यांच्या गाडीत बसायचे. पदाधिकाऱ्यांना गाडीतून उतरवायचे मग एवढा राग का? मी मुश्रीफ यांचं नाव देखील घेतलं नव्हतं. मग त्यांना का बर एवढं झोंबलं? असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.
तुम्ही मंडलिकांची जागा घेतली त्याचं काय : आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेत आहेत, अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना आमदार आव्हाड म्हणाले की, मुश्रीफ साहेब तुम्ही तुमचं बघा. तुम्ही कोणाची जागा घेतली? ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्यांना आज त्रास देत आहात. सदाशिवराव मंडलिक यांची तुम्ही जागा घेतली नाही का? आम्ही छोटे असलो तरी खूप इतिहास घेऊन फिरत असतो. शरद पवार यांनी आणखी काय करावं अशी मुश्रीफ यांची इच्छा आहे, असा खोचक सवाल आमदार आव्हाड यांनी केला.
पत्रावर माझी सही मात्र गद्दारी नाही : जेव्हा एकनाथ शिंदे गेले, तेव्हा एक बैठक पार पडली. तेव्हा वेगळा विचार करायला हवा म्हणून एक पत्र लिहिण्यात आलं होतं. त्यावर माझी सही होती. कारण 53 माणसांबरोबर बसून मी त्याला विरोध करू शकत नव्हतो. मी सही केली; मात्र कधी गद्दारीची भाषा केली नाही. ते पत्र कुठे आहे दाखवा. ते पत्र शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही. ज्याच्याकडे पत्र होतं त्यांनी ते पत्र खिशात ठेवलं आणि घरी नेऊन फाडून टाकल, हे मंत्री मुश्रीफ यांना माहीत नसेल तर आज सांगतो असंही आमदार आव्हाड म्हणाले.
हेही वाचा:
- Vijay Wadettiwar : 'पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांसोबत रोड शो केला नाही, कारण...'; विजय वडेट्टीवारांचे थेट आरोप
- Sharad Pawar On Modi : कोल्हापुरात शरद पवारांचा धोबीपछाड, मुश्रीफांसह बच्चु कडूंना लोळवलं, मोदींनाही सुनावले खडे बोल
- Sunil Tatkare On Sharad Pawar : शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य - सुनील तटकरे