कोल्हापूर -शहरातील जुना बुधवार पेठेतील रोहन मारुती जाधव यांच्याविरुद्ध अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याबाबतच्या तक्रारीनुसार सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या पथकाने जाधव यांच्या घरातून काही साहित्य जप्त केले आहे. यामध्ये कच्च्या नोंदी असलेल्या वह्या व डायऱ्या, कोरे व लिखित धनादेश व हस्तलिखित बॉन्ड, संचकार पत्रे, दस्त, भीशी नोंद वही व जमिनीशी संबंधित कागदपत्रे, असे महत्वपूर्ण दस्तऐवज आहेत. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्हा उपनिबंधक शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन मारुती जाधव हा शहरात अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार पडताळणी करून पुढील आवश्यक ती कारवाई करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानुसार झडती घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार संबंधित सावकाराच्या घरावर जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखालील नियुक्त पथकाने छापा टाकला. यावेळी त्यांच्या राहत्या घरातून कच्च्या नोंदी असलेल्या वह्या व डायऱ्या, कोरे व लिखित चेक व हस्तलिखित बॉन्ड, संचकार पत्रे, दस्त, भीशी नोंद वही व जमिनीशी संबंधित कागदपत्रे, असे महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये सहकार विभागाचा एक अधिकारी आणि 7 कर्मचारी, असे 8 आणि 7 पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश होता. झडतीमध्ये प्राप्त झालेल्या अवैध सावकारीचे दस्तऐवज, बाँन्ड, कोरे चेक व इतर नोंदवह्या यांच्या चौकशीचे काम सुरू आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल व पोलीस प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीच्या अनुषंगाने आर्थिक पिळवणूक, अवैध सावकारीच्या ओघात स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकावली असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहनही यावेळी अमर शिंदे यांनी केले आहे.