कोल्हापूर- आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. टाळ, मृदुंग आणि विठू माऊलीच्या गजरात आज उभी पंढरी न्हाऊन निघते. अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. कोल्हापूर येथून प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे. सकाळी येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठमार्गे ही दिंडी साने गुरुजी वाशी मार्गे प्रति पंढरपूर नंदवाळकडे रवाना झाली.
पुईखडी याठिकाणी असलेल्या मैदानात रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील लाखों भाविक उपस्थित राहतात. हा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होऊन नंदवाळ या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. यावेळी भाविक दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतात. आज सकाळपासूनच याठिकाणी भाविकांनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली आहे.