कोल्हापूर - 'दख्खनचा राजा' अशी ओळख असलेल्या ज्योतिबाच्या महात्म्यावर आधारित एक मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे मालिकेचे चित्रीकरण सुरू राहणार असून चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ आज निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कोठारे व्हिजन्सचे कोल्हापुराशी खूप जुने व घट्ट नाते आहे. ज्योतिबाचे देवस्थानदेखील कोल्हापूर नगरीत आहे. त्यामुळेच मालिकेचे चित्रीकरणही कोल्हापुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर चित्रनगरीत ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भव्यदिव्य सेट लवकरच उभा राहणार असून स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची टीम या नव्या पौराणिक मालिकेसाठी जोमाने कामाला लागली आहे, अशी माहिती महेश निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिली.
कोल्हापुरात संपूर्ण मालिकेची चित्रीकरण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, आता कोल्हापूर चित्रनगरीत सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या मालिकेचे येथे चित्रीकरण करणे शक्य झाले आहे. चित्रीकरण पूर्ण होताच रोजचे एपिसोड चित्रनगरीतून थेट मुंबईतील स्टुडिओमध्ये अपलोड होणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेही सहकार्य मिळाल्याचे कोठारे यांनी सांगितले.
लवकरच चित्रीकरणाचा श्रीगणेशा होणार असून ज्योतिबाची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी महेश कोठारे यांच्या 'जय मल्हार' या पौराणिक मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.