कोल्हापूर - कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आजपासून कोरोना लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. याची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सकाळी साडेदहा नंतर या लसीकरणाला सुरुवात होणार असून आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जिल्ह्यात 14 ठिकाणी लसीकरण केंद्र उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 14 लसीकरण सेंटर उभारण्यात आली आहेत. कोल्हापूर शहरात 6 तर ग्रामीण भागात 8 सेंटर आहेत. आज दिवसभरात 1400 जणांना देणार लस देण्यात येणार आहे. 420 कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नेमणूक करण्यात आली आहे. थोड्या वेळात लसीकरणला सुरवात होणार आहे. हे लसीकरण ऐतिहासिक आहे त्यामुळे यामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांना अभिमान वाटतोय.
रांगोळी काढून कोरोना योध्याचे स्वागत
गेल्या आठ महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन कोरणा रुग्णांची सेवा केली . अशा सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने कौतुक करत या लसीकरण मोहिमेत त्यांचे स्वागत रांगोळी काढून करण्यात येत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्राच्या बाहेर रंगीबिरंगी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालून त्यांना केंद्रात दाखल केले जाणार आहे. जिल्ह्यात अशा चौदा ठिकाणी लसीकरणाची केंद्र सुरू करण्यात आले आहेत.