कोल्हापूर - जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोल्हापुरातल्या बिंदू चौक येथील कारागृहातील काही कैद्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे आता लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (रविवारी) दिवसभरात तब्बल १६० कैद्यांना कोरोना प्रतिबंधात्मक पहिला डोस देण्यात आला. लवकरच बिंदू चौक कारागृहातील कैद्यांना सुद्धा लस देण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासन चांगलेच कामाला लागले असून आरोग्य यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.
लवकरच बिंदू चौक येथील कारागृहातील कैद्यांना लस
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील १६० कैद्यांना आज कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. या कारागृहातील उर्वरित आणि बिंदू चौक येथील कारागृहातील बंदीजनांचे सुद्धा लवकरच लसीकरण करण्यात येणार आहे. बिंदू चौक येथील तब्बल ३२ कैदी कोरोना बाधित आढळले होते. याच पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांचे सुद्धा महापालिकेकडून लसीकरण केले जात आहे. शिवाय कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांची काल (शनिवारी) पार पडली आढावा बैठक
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णापैकी 50 टक्के रुग्ण हे या एकट्या कोल्हापूर शहरातील आहेत. त्यामुळे शहरातील यंत्रणा वेळेवर कार्यान्वित करण्यासाठीच्या नियोजनाबाबत काल शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. गेल्यावर्षी एकावेळी २ हजार २०० रुग्ण पॉझिटिव्ह येतील याअनुषंगाने सर्व सुविधांचे नियोजन करण्यात आले होते. यंदा मात्र एकावेळी दिवसात ३३०० रुग्ण पॉझिटिव्ह आले तरी यंत्रणा कुठेही तोकडी पडणार नाही असे नियोजन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे, असे पालकमंत्र्यांनी म्हंटले होते. शिवाय लसीकरण सुद्धा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी म्हंटले होते.