पन्हाळा (कोल्हापूर) - बाजारातील वाढत्या मागणीमुळे भारतातील जरबेरा फुलशेतीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात जरबेरा शेती केली जाते. दिसायला आकर्षक असणाऱ्या जरबेरा फुलांचा लग्न कार्यात तसेच फुलांचे गुच्छ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. मात्र, कोरोनामुळे आता हे सर्व शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावातील शेतकरी उदय आनंदराव पाटील यांनाही आता कोरोनामुळे नुकसान सोसावे लागत आहे.
उदय पाटील यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात जरबेराची लागवड केली आहे. लाखो रुपये खर्च करून त्यांनी दोन वेगवेगळी हरितगृह तयार केली आहेत. यामध्ये त्यांना उत्पादनही चांगल्या पद्धतीने मिळत होते. मात्र, कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले. परिणामी ऐन लग्नसराईत फुलांची वाढलेली मागणी बंद झाली आहे. त्यामुळे त्यांना दररोज 7 ते 8 हजार फुले अक्षरशः फेकून द्यावी लागत आहेत.
उदय पाटील यांनी कर्ज काढून हरितगृहाची उभारणी केली आहे. मात्र, कोरोनामुळे ते मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने सर्वच हरितगृह शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. बाजारपेठत चांगली मागणी असल्याने काही शेतकरी जरबेरा फुलशेतीकडे वळले आहेत. मात्र, पाटील यांच्यासारखे शेकडो शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून, याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी, मागणी ते करत आहेत.