कोल्हापूर - आजपर्यंत आपण अनेक सेल पाहिले आहेत. पण कोरोना विषाणूच्या धास्तीने कोल्हापुरात चक्क कोंबड्यांचा सेल लावण्याची वेळ पोल्ट्री व्यवसायिकांवर आली आहे. एरवी जवळपास 200 रुपयांना जाणारी कोंबडी चक्क 40 ते 50 रुपयांना विकण्याची वेळ त्यांच्यावर आली असून 200 रुपयांना चक्क 5 कोंबड्या असा सेलच लावल्याचे पाहायला मिळत आहे.
कागल तालुक्यातील एका व्यावसायिकाने कोंबड्यानी भरलेला टेम्पो रस्त्याकडेला लावून हा आगळा-वेगळा सेल लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सेल सेल असे म्हणत ओरडत असतानाही त्याकडे कोणीही फिरकताना दिसत नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर या कोरोना विषाणूचा किती मोठा परिणाम झाला आहे हे दिसून येत आहे.
चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात आत्तापर्यंत ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १०४ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनबाहेर २८ हजार ६०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही ४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाची लागण होते, या सोशल मीडियावरील खोट्या अफवांमुळे लोकांनी चिकन-मटण घेण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल असलेला हा व्यवसाय आतबट्यात आला आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - रविना टंडनने तमाम पुरुषांना दिले 'हे' आव्हान.. म्हणाली, मग मी मानते..!
हेही वाचा - रिक्षाचालकाची मुलगी बनली एक दिवसाची स्थायी समिती सभापती