कोल्हापूर - सर्वांना जय महाराष्ट्र ! दादा... समाधानी आहात का... शिवभोजन थाळी कशी आहे... योजना आवडली का... केवळ घोषणा न करता या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री उव ठाकरे यांनी आज कोल्हापूरातील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी वेब लिंकवरून संवाद साधला. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. याच ठिकाणी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वेब लिंकच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. भोजनाची गुणवत्ता, टापटिपपणा आणि स्वच्छतेबाबत तडजोड नको अशा सूचना सुद्धा यावेळी शिवभोजन थाळी केंद्र चालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुद्धा यावेळी या योजनेबद्दल माहिती दिली. योजनेच्या शुभारंभ झाल्यापासून या ठिकाणी १०० टक्के थाळ्या संपत आहेत. समोरच महापालिकेचे सावित्रीबाई फुले रूग्णालय असल्याने शिवभोजन योजनेचा खूप चांगला फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर योग्य त्या सुविधा दिल्या जातात का ते पहा आणि त्यांना सहकार्य करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला होतोय यातच मला आनंद आहे, असे सांगून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.