कोल्हापूर - भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमनेसामने येत जोरदार गोंधळ घातला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी आज राज्यभरात काँग्रेसचे आंदोलन आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काँग्रेसने भाजपचे कार्यकारणी सदस्य धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचवेळी भाजपाचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती लक्षात घेऊन आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे मुन्ना(धनंजय महाडिक) आणि बंटी(सतेज पाटील) यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण होते.