कोल्हापूर - जिल्ह्यात आठ ठिकाणी नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभा करणार असून त्याबाबत टेंडर प्रक्रिया जाहीर केली आहे. 1 मे पासून लसीकरणासाठी संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांनी नोंदणी करूनच लस घेण्यासाठी केंद्रावर जावे. नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले. कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ सुद्धा उपस्थित होते.
मृत्यूदर कसा कमी करता येईल याबाबत प्रयत्न सुरू
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यासंबंधी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. शिवाय जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची सुद्धा कमतरता भासू लागली आहे. त्याबाबत सुद्धा पाठपुरावा सुरू आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याचे डेथ ऑडिट करण्याचे काम जिल्ह्यात आरोग्य अधिकारी करत आहेत. मृत्युदर कसा कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नागरिक लक्षणे असूनही त्याकडे दुर्लक्ष करत असतात त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लक्षण समजताच रुग्णालयात जाऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.