कोल्हापूर - लहान मुलांना घरात बोलावून, त्यांना खाऊचे आमिष दाखवून त्या मुलांशी एका महिलेसह तिच्या मुलीने लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांच्या पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार त्या महिलेला आज अटक करण्यात आले आहे. तर तिच्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील एक महिला व तिची अल्पवयीन मुलगी या दोघी शेजारच्या तसेच परिसरातील अल्पवयीन लहान मुलांना खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलवत होत्या. ही लहान मुले त्या घरात गेल्यानंतर ती महिला व तिची मुलगी दोघीही त्या मुलांसोबत लैंगिक चाळे करत असत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र, आता त्याला वाचा फुटली.
संबंधित लहान मुलांच्या पालकांच्या हा संपूर्ण प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे पालकांनी त्या महिलेला याबाबत जाब विचारला. मात्र जाब विचारल्याच्या कारणातून त्या महिलेने व तिच्या मुलीने पालकांनाच शिवीगाळ केली. त्यानंतर चार पीडित लहान मुलांच्या पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत त्या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलगीच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आज त्या लैंगिक चाळे करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तर तिच्या अल्पवयीन मुलगीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे कसबा बावडा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके व पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.